धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदान पाहून विद्यार्थी झाले भावुक
कल्याण दि.13 मार्च :
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, बलिदानावर आधारित छावा चित्रपटाने शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमींना चांगलीच भुरळ घातली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा दैदिप्यमान इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कल्याणातील माजी आमदार नरेंद्र पवार फाऊंडेशन तर्फे 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणातील SM5 चित्रपटगृहात आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्यांनी मुघलांशी दिलेली कडवी झुंज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांचे योगदान या सर्वांचा मिलाफ म्हणजे “छावा चित्रपट”. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नव्हे तर जगभरात भगवं वादळ उभे केले आहे.
हिंदवी स्वराज्य आणि आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम आणि त्यासाठी दिलेले बलिदान नव्या पिढीसमोर पोहचणे आवश्यक आहे. नेमक्या याच उद्देशाने आपण 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती नरेंद्र पवार फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. तसेच या चित्रपटाला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून आपल्याला अधिक आनंद झाल्याची भावनाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
तर आमच्या पिढीला हिंदवी स्वराज्याचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर अनावश्यक गोष्टी करण्यापेक्षा आणि पाहण्यासाठी आमच्यासारख्या युवा पिढीने हा चित्रपट पाहणे आवश्यक असल्याचे आग्रही मत हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्त्या हेमा पवार, प्रिया शर्मा, सदा कोकणे, चंद्रलेखा गायकवाड, संगीता घाटे, यशोदा पाटील, जनार्दन कारभारी, किशोर म्हस्के, विवेक गायकर, किशोर खैरनार, प्रवीण हेंद्रे, विकास साळवी तसेच नरेंद्र पवार फाउंडेशचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.