कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात बीएमएमच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या श्रुती भोईरची मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात निवड झाली आहे. बिर्ला महाविद्यालयाला तब्बल 25 वर्षांनंतर हा बहुमान मिळाला आहे. श्रुतीने राज्य आणि राष्ट्र स्तरावरील विविध स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. (Kalyan’s Shruti Bhoir selected in Mumbai University badminton team)
बिर्ला महाविद्यालयाला २५ वर्षानंतर हा बहुमान…
२५ सप्टेंबर २०२३ रोजी विभागीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. ठाणे, मुंबई आणि कोकणातील २२ महाविद्यालयांच्या टीम यात सहभागी झाल्या होत्या, त्यात श्रुतीला ब्राँझ मेडल मिळाले. कल्याण येथे झालेल्या आंतर महाविद्यालय बॅडमिंटन स्पर्धेत ती पहिली आली. तिच्या निमित्ताने बिर्ला महाविद्यालयाला २५ वर्षानंतर हा बहुमान मिळाला. श्रुती भोईरचे खेळातील प्रावीण्य पाहून मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात तिची निवड झाली आहे. याचे श्रेय तिने शिक्षक, प्रशिक्षक श्रीकांत वाड सर, भागवत सर आणि पालकांना दिले आहे.
नवे आकाश झाले खुले…
श्रुतीला बालपणापासून बॅडमिंटन खेळाची आवड आहे. तिच्या आजी- आजोबा आणि आई वडिलांनीही तिची आवड जोपासत प्रोत्साहन दिले. त्यामुळेच बिर्ला महाविद्यालयात आल्यावर तिच्यासाठी नवे आकाश खुले झाले. बॅडमिंटन खेळत असताना ती अभ्यासही तितक्याच आवडीने करते.